रत्नागिरी - राज्यात दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. देशातील एकूण कोरोनाबधितांची तुलना करता एकट्या महाराष्ट्रात 52 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
घरात बसून सरकार चालवता येत नाही, प्रसाद लाड यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
देशातील एकूण कोरोनाबधितांची तुलना करता एकट्या महाराष्ट्रात 52 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केली.
ज्या व्यवस्था आपण उभ्या करायला हव्या होत्या, त्या आपण उभ्या करायला कमी पडलो. लॉकडाऊन हे या व्यवस्था उभ्या करण्यासाठी केलं होतं, घरात बसण्यासाठी दिलं नव्हतं. घरात बसून सरकार चालवता येत नाही, अशी टीकाही प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पर्यटनाला गेले म्हणणं सोप्प असतं, पर्यटनाला येण्याची देखील हिंम्मत दाखवावी लागते, जी या सरकारमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. मुख्यमंत्र्यांनी अजून रायगडच्या पुढची पायरीही ओलांडली नसल्याचे लाड म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजप आणि केंद्र सरकार या कोरोनाच्या काळात शंभर टक्के राज्यसरकारच्या मागे आणि निसर्ग चक्रीवादळाच्या काळात कोकणच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे लाड म्हणाले.