रत्नागिरी -राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. या दौऱ्यावरून टिका करणाऱ्या शिवसेनेला आणि काॅग्रेसला भाजपाचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी उत्तर दिलं आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. राज्यपाल कोणत्याही जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणे म्हणजे थेट केंद्रापर्यत आणि राष्ट्रपती यांच्यापर्यंत माहिती पोहचवणे, असा याचा अर्थ असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले आहे.
...म्हणून राज्यपाल दौरे करत आहेत
'...म्हणून राज्यपाल दौरे करत आहे'
यावेळी राणे म्हणाले, की कुठल्याही सरकारचे प्रमुख हे राज्यपालच असतात. आपण राज्यपालांचे अभिभाषण ऐकतो त्यावेळी राज्यपाल माझं सरकार म्हणुन भाषणाची सुरूवात करतात. सरकारचे प्रमुख तेच आहेत. त्यांच्या अजेंड्यावर सरकार चालते. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल हे राज्याचा दौरा करत असतात. मराठवाड्याचा दौरा करणारे आपले राज्यपाल हे पहिले नाहीत. जिथे परिस्थिची हाताच्या बाहेर जाते, तिथं राज्यपाल जाणे म्हणजे भाजपा वाढवणे असा अर्थ होत नाही, असा खोचक टोला माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यपालांचा दौरा म्हणजे थेट केंद्रापर्यत आणि राष्ट्रपती यांच्यापर्यंत माहिती पोहचवणे. राज्यातल्या कोणाला कुठली अडचण होता कामा नये, यासाठी राज्यपाल दौरा करत आहे, असे प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिले आहे.
'पटोले साहेबांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्याव'
दरम्यान राज्यपाल दौऱ्यावरून टीका करणाऱ्या काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांना विचारतं कोण, त्यांना आम्ही गांभिर्यांने घेत नाही. पटोले साहेबांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोला निलेश राणे यांनी यावेळी लगावला.