रत्नागिरी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांसमोर सामंत कसे ढोंग करतात, तो खरा चेहरा आज मी समोर आणला आहे. दोन तासातच उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. सामंत कसली संस्कृतीची वार्ता करत आहेत? 2019च्या निवडणुकीत तुमची सगळी संस्कृती काढली होती, हे अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे. सामंतांनी संस्कृतीची भाषा करू नये. अनेक माजी मुख्यमंत्री रत्नागिरीत येतात त्यावेळी सामंत भेटायला जात नाहीत. म्हणून ही राजकीय संस्कृती सामंतांच्या तोंडातून शोभत नाही, असा जोरदार टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एकदिवस आधी उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असा गौफ्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत अशी कोणतीही भेट झाली नसल्याबाबत खुलासा केला. तर ही पत्रकार परिषद म्हणजे मातोश्रीवर अडचणीत आल्याने, निव्वळ सारवासारव असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -नवीन सॉफ्टवेअरमुळे कोरोना चाचणी रिपोर्ट तासाभरात मोबाईलवर
संस्कृतीची भाषा सामंतांनी करू नये -
राणे म्हणाले की, खरे तर सामंत बंधूंचा ढोंगीपणाचा खरा चेहरा जनतेसमोर मी उघडकीस आणला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना त्यांना भेटायचे नव्हतेच पण सामंत वशिल्याने गर्दीतून वाट काढत काढत फडणवीस यांच्यासमोर उभे राहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना भेटावे लागले, असेही निलेश राणे यांनी सांगितले. संस्कृतीची भाषा सामंतांनी करू नये. त्यांच्या तोंडी ती शोभत नाही. मातोश्रीवर या सगळ्या गोष्टी चालत नाही, हे सामंतांना महिती आहे. त्यामुळे आहे ते मंत्रिपद वाचवण्यासाठी उदय सामंताना हा खुलासा करावा लागला, असे निलेश राणे यांनी सांगितले.