रत्नागिरी -सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करत आरोप केले होते. या आरोपांना माजी खासदार निलेश राणेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडून मिळते. वैद्यकीय महाविद्यालयाची जमीन आमची खासगी आहे. त्यावर कर्ज घेऊन रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. इथल्या परवानगीसाठी राज्य सरकारची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात का दुखतंय, असा सवाल करत निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे हे दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवर फोन करत होते, असा गौप्यस्फोट शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात बोलताना केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, मातोश्रीने विनायक राऊतांना कोकणात राणेंवर भुंकायला पाठवले आहे. विनायक राऊत मातोश्रीवरचे 'टाॅमी' असल्याची टीका निलेश राणेंनी केलीय. लोकांची सेवा करणे ही त्यांची 'ड्युटी' नाही, तर मातोश्रीवरच्या बक्षीसासाठी विनायक राऊत राणेंवर बोलतात. ग्रामपंचायतीची निवडणूक आहे आणि आरोप राणेंवर. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत पातळीवर काही काम केले नाही, हे स्पष्ट होत आहे, असा आरोप निलेश राणेंनी केला आहे.
हेही वाचा -'घोटाळेबाज प्रताप सरनाईकवर महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार?'