रत्नागिरी -खासदार विनायक राऊत यांनी टीकेच्या व्यतिरिक्त पुराव्यांबाबत कोणताच खुलासा केला नसून कागदही वाचू न शकणाऱ्या विनायक राऊतांनी आधी खुलासा करावा, असे आव्हान भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर पुराव्यासकट पत्रकार परिषदेत सादर केले होते. यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी खासदार राऊत यांना आव्हान दिले आहे.
हेही वाचा -राणेंना कवडीची किंमत देत नाही..; रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ
नाणारमध्ये जमीन व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. जागेच्या या घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाची कंपनी असून या सुगी डेव्हलपर्स कंपनीचे संचालक निशांत देशमुख यांनी १४०० एकर जागा परप्रांतियांना विकली असून जमीन घोटाळ्यात थेट मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला विरोध आणि नंतर रत्नागिरीवासियांना लुटायचे ही शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.