रत्नागिरी - शिवसेनेने 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्याचे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय. 'आम्हाला फसवलं गेलं' ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेनेने दिशाभूल केली असून, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. आज (20जानेवारी) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेला सावरकरांच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.
निवडणुकीच्या आधी शिवसेना सावरकरांच्या मुद्यावर कंबरडे मोडायची भाषा करत होती. आता सत्तेसाठी लाचार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथा नाही घातल्या तरी चालतील, त्यांनी फक्त 'सावरकर आमचा अभिमान आहे', हे बोलून दाखवावे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
सावरकरांबद्दल निर्भीडपणे बोलणाऱ्या खासदार संजय राऊत यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. संजय राऊत या खऱ्याखुऱ्या हिंदुत्ववादी माणसाने केलेल्या मागणीचे आम्ही समर्थन करत असल्याचे लाड यांनी यावेळी सांगितले.