रत्नागिरी- रिफायनरीवरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता, रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेतली. आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनीही तुमची ही भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू, असे आश्वस्त करत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यासाठी त्यांची वेळ घेऊन कळवतो, असे समर्थकांना सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जागा मालकांनी जागा देण्यासाठी दिलेली संमतीपत्रे मंत्री पाटील यांच्यापुढे
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जनमताचा आदर करून योग्य तो निर्णय होईल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या दौऱ्यावेळी समर्थकांनी रत्नागिरी तसेच राजापूरमध्ये जयंत पाटील यांची भेट घेत सद्यस्थिती त्यांच्यासमोर मांडली. तसेच साडेआठ हजार एकर जागा मालकांनी जागा देण्यासाठी दिलेली संमतीपत्रे मंत्री पाटील यांच्यापुढे सादर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह खासदार शरद पवार यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांबरोबर तुमची भेट घडवून आणू, असे सांगितल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे समर्थक या भेटीबाबत आशावादी आहेत.
रिफायनरीचा ठाकरे सरकारने पुनर्विचार करावा - बाळ माने
तर दुसरीकडे भाजपकडूनही शिवसेनेला आवाहन करण्यात आले आहे. 'तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्र सरकारने रत्नागिरीत नाणार रिफायनरी व्हावी, ही भूमिका घेतली होती. तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प कोकणचे भविष्य बदलून टाकणारा, उजळवून टाकणारा होता. मात्र, दुर्दैवाने भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे या रिफायनरी प्रकल्पाचा ठाकरे सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी भाजप नेते माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी केली आहे.
भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला
याबाबत बोलताना बाळ माने म्हणाले की, कोकणातील तरुणाईच्या हाताला रोजगार देणारा, असा हा मोठा प्रकल्प आहे. मात्र, काही लोकांच्या विरोधाला पाठिंबा देत, त्यांच्या भावनेच्या आहारी जात शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे हा चांगला प्रकल्प रखडला आहे. विरोधामुळे हा प्रकल्प होऊ शकलेला नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार, आमदार यांनी या प्रकल्पाला विरोध केला. वास्तविक राज्यासाठी, देशासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा होता. नवे रोजगार या ठिकाणी आले असते. मोठी गुंतवणूक येथे आली असती. परंतु, भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे जिल्ह्यासाठी असलेली एक मोठी संधी दूर गेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ही रिफायनरी ठाकरे सरकारने जिल्ह्यात आणली पाहिजे. नाहीतर येथील तरुण पिढी ठाकरे सरकारला माफ करणार नाही. म्हणून मला आजही वाटते की नाणार रिफायनरी व्हायला हवी. त्यातून कोकणचा विकास होणार आहे. रत्नागिरीचा जीडीपी वाढणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे. या सर्व भूमिका विचारात घ्यायला हव्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा असे माने यांनी म्हटले आहे.