रत्नागिरी -शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीतून भाजपकडून करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी भाजप कदाचित दंगल घडवेल, अशा आशयाचं विधान भास्कर जाधव यांनी गुहागर येथे झालेल्या मेळाव्यात केलं होतं. यावरून भाजपचे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी गुहागर पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे. कारवाईची मागणी केली आहे.
भास्कर जाधव यांच्या वादग्रस्त विधानावरून गुहागरमध्ये भाजपची तक्रार
भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीतून भाजपकडून करण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी भाजप कदाचित दंगल घडवेल, असं विधान भास्कर जाधव यांनी गुहागर येथे झालेल्या मेळाव्यात केलं होतं. यावरून भाजपचे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी गुहागर पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारीत काय म्हटले आहे-दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी स्थानिक नेते व विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी गुहागर ( जि . रत्नागिरी ) येथे एका सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना, मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा राज्यभरात दंगली घडवेल, असे अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. सदर विधान करताना त्यांनी त्यापुष्ट्यर्थ कोणतीही माहिती अथवा आधार दिलेला नाही. तर समाजातील दोन घटकांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने सदर विधान केले असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३A , २ ९ ५ A, ५०५ IPC नुसार कारवाई करण्यात यावी. मूलत: जाधव यांनी केलेले उपरोक्त विधान हे कोणत्याही आधाराशिवाय, पुराव्याशिवाय केलेले असून केवळ काही समाज घटकांच्या भावना भडकवण्याच्या व्देषमूलक भावनेतून जाणूनबूजून वरील चिथावणीखोर वक्तव्य केलेले आहे. अशा स्थितीत आगामी काळात येणारे गणेशोत्सव, नवरात्र, दीपावली तसेच ईद यासारखे हिंदू मुस्लिम सणासुदीचे दिवस विचारात घेता जाधव यांच्या विधानाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये याकरीता जाधव यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून कारवाई करणे आवश्यक आहे.
मूलतः भाषणांत पुढे श्री . जाधव यांनी पक्षप्रमुखांची भेट घेऊन रायगड जिल्ह्यातून सुरुवात करून राज्यभर दौरे करणार असल्याचेही म्हटले आहे . जाधव यांचेवर वेळेत कारवाई न झाल्यास अशाप्रकारच्या व्देषमुलक विधानांची पुनरावृत्ती त्यांच्याकडून राज्यभरातील दौऱ्यात होण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत राज्यभरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते. सदर संभाव्य धोका विचारात घेता जाधव यांचेवर वेळीच तातडीने भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १५३A , २ ९ ५ A, ५०५ IPC नुसार कारवाई करण्यात यावी, अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.