रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यानंतर देखील रस्त्यावर दुचाकींची रहदारी कमी झालेली नाही. परिणामी आता रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी क्षेत्रात आजपासून बाईकला बंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली.
तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा आहे. तर, अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पास दिले जाणार आहेत. त्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर नागरिकांना संबंधित तपशील भरावयाचा आहे. याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, पास मिळवायला होणारी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस ऑनलाइन सेवा देणार आहे.
कोरोना संक्रमणाची भीती असताना अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हा प्रशासनाकडून पास देण्यात येत होता. या पासद्वारे मालाची वाहने, मेडिकल सेवेतील व्यक्तीसह अनेकजणांना बंदीच्या काळातही प्रवास करता येत होता. मात्र, हा पास काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयांवर गर्दी होऊ लागली आणि यामुळे धोकाही वाढला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाने एकत्र येऊन ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी http://covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करा आणि त्याद्वारे आवश्यक माहिती भरून दिल्यानंतर QR code उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा code दाखवल्यानंतर वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये एकाही कागदाची, प्रत्यक्ष येऊन भेटण्याची गरज लागणार नाही, केवळ हा पास अत्यावश्यक सेवेसाठी लागू होईल, हेही डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. याचवेळी शनिवारी मध्यरात्रीपासून शहरी भागात दुचाकीला बंदी घालण्यात आली असल्याचे डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले. तर भाजीविक्रेत्यांना रत्नागिरी शहरात ठिकाणी वेगवेगळे बसविण्यात येणार असून त्यामुळे लोकांना त्यांच्या घराजवळच भाजी उपलब्ध होणार आहे.
त्याशिवाय किराणा मालासाठी घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून लोकांची बाहेर पडण्याची कारणे कमी होणार आहेत, हे स्पष्ट केले. राज्याच्या तुरुंगातून 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना पॅरोलवर सोडणार आहेत. त्यात रत्नागिरी जेलमधून सुमारे 13 कैदी पॅरोलवर सोडले जातील असेही त्यांनी सांगितले.
या कोरोनाचा सामना करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो असून लोकांनी घरीच राहावे, असे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले आहे.