रत्नागिरी- लॉकडाऊनच्या काळात पत्ते व मोबाइलवर वेळ घालवण्यापेक्षा मोकळ्या वेळेची संधी घेत रत्नागिरी तालुक्यातील वेळवंडमधल्या भायजेवाडीतील ग्रामस्थांनी तब्बल 40 फूट खोल विहीर खोदली आहे. सध्या या विहिरीला मुबलक पाणी आहे. या 'लॉकडाऊन' विहिरीची सर्वत्र चर्चा आहे.
ग्रामस्थांनी खोदली 'लॉकडाऊन विहीर' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाला आणि अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. हातावर पोट असणारेही घरीच राहू लागले. त्यामुळे घरात नेमकं करायचं काय, असा प्रश्न अनेकांसमोर होता. पण वेळ जात नव्हता म्हणून अनेकांनी वेगवेगळे टाइमपास करणारे खेळ सुरू केले. मात्र, काही ग्रामस्थ असेही आहेत की, ज्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत चक्क 'लॉकडाऊन' नावाची विहीर खोदून लॉकडाऊनचं चिरंतन करून ठेवले. ही गोष्ट आहे रत्नागिरी तालुक्यातील वेळवंडमधल्या भायजेवाडीतील ग्रामस्थांची.
ग्रामस्थांनी खोदली 'लॉकडाऊन विहीर' हेही वाचा -'काय भौ...खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकतो अन् कोरोना पसरवतो'
लॉकडाऊन जाहीर झाला. पण वेळ जात नव्हता म्हणून अनेकांनी वेगवेगळे टाइमपास करणारे खेळ सुरू केले. मात्र, त्याला अपवाद ठरले ते भायजेवाडीतील 10 घरांची भायजे भावकी. वाढती कुटुंब संख्या त्यात दिवसेंदिवस पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेऊन त्यांनी विहीर खोदण्याचा फक्त निर्णयच घेतला नाही, तर प्रत्यक्ष या कालावधीत 40 फूट विहीर खोदत एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि लॉकडाऊनचा काळ सुखद केला.
महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. दगडातून पाणी काढणे म्हणजे रक्ताचे पाणी करण्यासारखे आहे. तरुण मुलांना विहीर खोदण्याचा अनुभव नव्हता. काही तरुण मुंबईतून आलेले तर काही रंगकाम, बांधकाम करणारे होते. पण, जुन्याजाणत्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन महिने मेहनत व चिकाटीच्या जोरावर विहीर खोदली. सध्या या विहिरीला पाणीही मुबलक आहे. ही विहीर खोदण्याच्या कामात महिलांचाही वाटा खूप मोठा वाटा असल्याचे ग्रामस्थ तुकाराम भायजे यांनी सांगितले. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भायजेवाडीतील ग्रामस्थांनी खोदली 'लॉकडाऊन विहीर' हेही वाचा -२२ जुलै : भारतीय ध्वज स्वीकृती दिन
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जिल्हा परिषद सदस्य परशुराम कदम व पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग, सरपंच संतोष गुरव, उपसरपंच मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत या विहिरीचे पूजन करण्यात आले. तसेच या विहिरीला 'लॉकडाऊन विहीर' असे नाव देण्यात आले. विहीर खोदून झाली, पण विहिरीतील पाणी घरापर्यंत पोहचवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पण एकूणच लॉकडाऊनमधला वेळ सत्कारणी लावत या ग्रामस्थांनी जे काम केलं आहे, ते नक्कीच आदर्शवत असंच आहे.