रत्नागिरी- राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चत झाला असून सध्या जाधव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या भेटीने भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित; कार्यकर्त्यांच्या घेतल्या गाठीभेटी - bhaskar jadhav ncp
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव आता हेही शिवसेना प्रवेशाच्या मार्गावर आहेत. त्यांचा शिवसेनाप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भास्कर जाधव यांनी शुक्रवारी गुहागर तसेच चिपळूणमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वस्तुस्थिती सांगितली. शिवसेनेतून आपल्याला निमंत्रण असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान भाजपच्या कोणत्याही नेत्याला आपण भेटलो नाही आणि भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी कार्यकर्त्याना सांगितले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
दरम्यान काही कार्यकर्ते जाधव यांच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचेही समजत आहे. मात्र एकूण घडामोडींवरून भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.