रत्नागिरी - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार नाराज आहेत. अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सत्ता माझी आहे, पण मी मात्र सत्तेत नाही असं म्हणत आपण तिसऱ्या अवस्थेतून जात असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली.
सत्ता माझी मात्र; मी सत्तेत नाही, मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेत्याची खदखद - मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज
ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार नाराज आहेत. अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
![सत्ता माझी मात्र; मी सत्तेत नाही, मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेत्याची खदखद ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5585114-thumbnail-3x2-papapa.jpg)
आज गुहागरमध्ये झालेल्या आभार मेळाव्यात बोलताना भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला तिसऱ्या अवस्थेत काम करायला लागणार आहे. आज माझी सत्ता आहे, पण मी मात्र सत्तेमध्ये नसल्याचे जाधव म्हणाले. आज मी विरोधी पक्षामध्येही नाही. जेव्हा प्रत्यक्ष सत्तेमध्ये मी होतो तेव्हा अनेक कामे केली आहेत. विरोधी पक्षात असतानाही कामे केली आहेत. तिसऱ्या अवस्थेमधून जात असताना विकासाची कामे करण्यासाठी मला तुमचा संपूर्ण विश्वास आणि पाठबळ हवे असल्याचे जाधव म्हणाले. यावरुन भास्कर जाधव यांची नाराजी अजून शमली नसल्याची दिसून आले.
भगवा फडकवण्याचं आवाहन
गावच्या ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीच्या खासदारापर्यंत शिवसेनेचा भगवा फडकण्यासाठी आपण जोमाने काम करण्यास सुरुवात करावी, असे आवाहन जाधव यांनी केले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीकेची झोड उठवणाऱ्या भाजपवर त्यांनी जोरदार हल्ला केला. भाजपने सेनेचे उमेदवार पाडण्यासाठी 44 ठिकाणी बंडखोर उभे करुन त्यांना रसद पुरवल्याचा गंभीर आरोपही जाधव यांनी केला.