रत्नागिरी - रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. यावरून पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्पाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांचे समर्थन नाणार परिसरातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आहे, की ९५० कोटीची गुंतवणूक करणाऱ्या बी.के.सी च्या गुजराती - मारवाडी लोकांसाठी आहे, असा सवाल कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला. तसेच नाणार रिफायनरीला स्थानिकांचा कालही विरोध होता,आजही आहे आणि भविष्यातही तो विरोध खूप मोठ्या प्रमाणात वाढताना तुम्हा सर्वांना दिसेल, असेही त्यांनी म्हटलं.
कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम राज ठाकरेंचा पत्रव्यवहार धक्कादायक राज ठाकरे यांनी नाणार परिसरात येऊन स्वतःच्या डोळ्यांनी जनतेचा किती विरोध आहे, हे पहिले आहे. त्यावेळी त्यांनी प्रकल्पाला विरोध करून आंदोलनाला पाठिंबाही दर्शविला होता. रिफायनरीच्या कार्यालयाचे खळ-खट्याक ही मनसेने केले. स्थानिक पातळीवरही मनसे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळेच आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला पत्रव्यवहार हा आम्हाला धक्कादायक वाटत असल्याचं वालम यांनी म्हटलं आहे.
सतर्क आणि एकत्र आहोत -
स्थानिक ग्रामस्थ व कोकणवासीयांनी दोन वर्षे सातत्याने संघर्ष करून रिफायनरी रद्द करवून घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यापासूनच रिफायनरीविरोधात ठाम आहेत. त्यांनी तर कोकणची राख करून गुजरातेत रांगोळी घालायला देणार नाही, असेही वक्तव्य केले होते. मुख्यमंत्री नाणार परिसरात रिफायनरी आणण्याच्या विरोधात ठाम असल्याने आम्ही रिफायनरीचा विषय सोडून दिला आहे. मात्र घडणाऱ्या घटनांवर बारीक नजर ठेवून आहोत. सतर्क आणि एकत्र असल्याचं वालम यांनी म्हटलं आहे.
कोकणात रिफायनरी नकोच -
रिफायनरीचे समर्थन करणारे स्थानिक दलाल ज्यांनी जमिनी गुजराती-मारवाडी गुंतवणूकदारांच्या घशात घातल्या. गुजराती-मारवाडी गुंतवणूकदार, ज्यात मुंबई बांद्रा बीकेसीसारख्या डायमंड मार्केटमधील भाजपा प्रणित व्यापारी सामील असून कंपनीचे अधिकाऱ्यांसहीत या सगळ्या समर्थनाला आर्थिक पाठबळ पुरवत आहेत. या जोडीला पक्षीय असंतुष्ट पदाधिकारी ज्यांना महत्व नाही, ते यांच्या सोबत काही मिळेल या आमिषाने शामिल झाले आहेत. करोडो रुपयांची गुंतवणूक वाया जाईल, या भीतीने हे समर्थक सर्व पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, सामान्य कोकणी माणूस आपलं गाव, आपली जमीन जागा, देव देवस्थान, निसर्ग अबाधित राहावा यावर ठाम आहे. संपूर्ण कोकणात कुणबी व बहुजन जोडो अभियानात आता अनेक सभा होत आहेत. कोकणवासीयांचे संघटन घट्ट होत आहे. या सर्वात कोकणात रिफायनरी सारखे प्रदूषणकारी प्रकल्प नकोच ह्यावर सर्वांचे एकमत असल्याचं वालम यांनी म्हटलं आहे.
आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम -
राजकीय पक्षांना, नेत्यांना जर कोकणाचा विकासच करायचा असेल, तर स्थानिक उत्पादन आंबा, काजू,फणस, नारळ, कोकम, नाचणी, कुळीथ बांबू, आदींवर प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी मदत करावी. सुंदर निसर्ग लाभलेल्या कोकणात पर्यटनाचा विकास करण्याची नीती आखून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करता येऊ शकतो. पण कंपनी, दलाल, गुंतवणूकदार यांच्या फायद्यासाठी जर कुणी प्रकल्पाची मागणी करत असेल तर ते कोकणी जनतेला चांगलेच समजते. आमचं कोकण वाचविण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचीही पर्वा केली नाही व यापुढेही करणार नाही. माजी विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी जमीन घोटाळ्यांची चौकशी लावली होती. ती आता पूर्ण व्हायला आल्यावरच अशी समर्थनाची भूमिका संशयास्पद वाटते. आम्ही नाणार परिसरातील ग्रामस्थ व समस्त कोकणी जनता रिफायनरी नको, यावर ठाम होतो व आताही आहोत, असं अशोक वालम यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?
कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ' रत्नागिरी राजापूर रिफायनरी'सारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल, ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हीत लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. शेजारची राज्ये महाराष्ट्राच्या घशात हात प्रकल्प घेऊन जात आहेत. अशा परिस्थिती महाराष्ट्रातून कोट्यवधीची गुतंवणूक असलेला प्रकल्प कोकणातून बाहेर जाता कामा नये, याकडे गाभीर्यांने लक्ष देणे गरजे आहे. नाही तर औद्योगिकरणात महाराष्ट्र अग्रेसर ही ओळख पुसायला वेळ लागणार नसल्याची भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली