रत्नागिरी- शहरातील ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात आर्ट सर्कल संस्थेच्या कला संगीत महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी सारस्वत बँकेचे रत्नागिरी शाखाधिकारी सतीश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
रोषणाई केलेल्या थिबा राजवाड्याच्या प्रांगणात या महोत्सवाचा पहिला दिवस रंगला तो भरतनाट्यम आणि शास्त्रीय गायनाने. नृत्यांगना डॉ. कनिनिका निनावे आणि पूजा भालेराव यांनी भरतनाट्यम सादर केले. त्यानंतर शास्त्रीय गायन श्रुती सडोलीकर-काटकर यांनी सादर केले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुग्धा वैशंपायन यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संतूरवादक संदीप चॅटर्जी आणि बासरीवादक संतोष संत यांच्यात जुगलबंदी होणार आहे.