रत्नागिरी - कामथे उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला डीएनए टेस्टचे सँपल घेण्यास उशीर घेण्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली होती. शनिवारी हा प्रकार घडला होता. या मारहाणीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी भुस्कुटे तसेच राधा लवेकर यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी त्या दोघींनाही अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कामथेतील डॉक्टरला मारहाण करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक, 2 दिवसांची पोलीस कोठडी डॉक्टरला धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी -
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका सामाजिक संस्थेच्या देखरेखीखाली चिपळूण येथील एका मतिमंद मुलीची व बाळाची शुश्रूषा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कायदेशीर तरतुदीनुसार नवजात बालकाचे डीएनए तपासणी करणे आवश्यक असल्याने पोलिसांच्या उपस्थितीत सामाजिक संस्थेच्या भुस्कुटे आणि लवेकर या शनिवारी १ मे रोजी कामथे रुग्णालयात गेल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय सानप यांना फोन करून कल्पना दिली होती. काही तांत्रिक कारणास्तव बाळाला कामथे रुग्णालयात पोहोचवण्यात उशीर झाला आणि तोपर्यंत डॉ. सानप हे दुपारच्या जेवणासाठी घरी गेले होते परंतु, त्यांनी येथील अन्य डॉक्टरांकडे ही जबाबदारी दिली होती. येथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत भुस्कुटे यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर बाचाबाची , हमरीतुमरीवर प्रकरण आले आणि भुस्कुटे व लवेकर यांनी येथे उपस्थित असलेले डॉ. मारुती कुंडलिक माने यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली, अशी फिर्याद डॉ. माने यांनी दिली आहे. त्यानुसार भुस्कुटे व लवेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे या करत आहेत. कोरोनाच्या काळात डॉक्टरला झालेल्या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. असेच प्रकार घडले तर सरकारी रुग्णालयात डॉक्टर काम करणार कसे, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.