रत्नागिरी- राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर टीका करत मनसेला टोला लगावला आहे. मनसेचा पूर्वीचा झेंडा हा विविध धर्मीयांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचे काय झाल? असा सवाल त्यांनी मनसेला केला. तसेच कोणी नाव घेतल्याने हिंदूहृदयसम्राट होत नाही, आणि झेंडा घेतला म्हणून हिंदूंची मत फिरत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान नाईट लाईफवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या खासदार नारायण राणे यांनाही पालकमंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी किमान कायदा सुव्यस्थेवर तरी बोलू नये, नाईट लाईफ संकल्पना नेमकी काय आहे, ते समजून घ्या, असा टोला परब यांनी लगावला आहे.
नाईट लाईफ हा शब्द चुकीचा असून मुंबई 24 तास हा त्याचा शब्द आहे. नाईट लाईफ म्हणजे चैनीखोरपणा हे विरोधकांनी डोक्यात घुसवले आहे. मुंबई 24 तासमध्ये बारच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कायदा सुव्यस्थेवर नारायण राणेंनी न बोललेलंच बरं, राणे काय बोलतात ह्यापेक्षा सरकार काय बोलते, हे महत्त्वाचं असल्याचे परब यांनी सांगितले.
- पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ; मात्र, चव घेणे टाळले