रत्नागिरी -औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, ही शिवसेनेची जुनी मागणी आहे. जेव्हा मनसेचा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून शिवसेनेची ही मागणी असल्याचे वक्तव्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी करत मनसेवर निशाणा साधला. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल. सर्वच निर्णय एका दिवसात घेता येणार नाहीत असेही परब म्हणाले.
'मनसेच्या जन्माच्या आधीपासून शिवसेनची 'ही' आहे मागणी'
जेव्हा मनसेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या विधानाची अनिल परब यांनी खिल्ली उडवली. पीएचडी करायच्या अगोदर तुमचा गाईड बुद्धीमत्ता बघतो. त्यांचा जो गाईड असेल, त्यांनी त्यांच्या बुद्धीची तपासणी करावी. मी पीएचडी केली आहे. माझ्या गाईडनी माझ्या बुद्धीमत्तेची तपासणी केली होती, असे म्हणत परब यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. आता चंद्रकांत पाटलांचा गाईड त्यांची तपासणी करेल आणि ठरवेल शरद पवारांवर पीएचडी केली जावू शकते का? अशा शेलक्या शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले.