रत्नागिरी -एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केलेल्या बंडामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक जागेवरच आहे हे दाखविण्यासाठी शिवसेनेकडून जिल्ह्यात मेळावे घेतले जात आहेत. रविवारी रत्नागिरीत मेळावा झाला तर आज चिपळूणमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. आमदार भास्कर जाधव यांच्याप्रमाणेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंत गीते ( Anant Gite ) यांनी देखील बंडखोर आमदारांचा समाचार घेत भारतीय जनता पार्टीवरही ( BJP ) निशाणा साधला.
भुताला बाटलीबंद करण्याची ताकद - यावेळी गीते म्हणाले की, महाडच्या भुताला बाटलीबंद करण्याची जशी माझी ताकद, तशी रत्नागिरी आणि दापोलीतल्या भुतांना बाटली बंद करण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे.
केवळ राजकीय स्वार्थासाठी कडवट हिंदुत्व विचारसरणी असलेल्या शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याच पाप तुम्ही करू नका अशी टीका यावेळी गीते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्यावर केली. शिवसेना की केवळ राज्याची नाही तर संपूर्ण राष्ट्राची गरज असल्याचे अनंत गीते ( Anant Gite ) यावेळी म्हणाले.
परतीची आशा सोडून द्या - जे गेलेत त्यांच्यापैकी एकही परत येणार नाही. ते प्रयत्न उद्धव साहेबांनी करू नयेत. मी प्रत्यक्ष भेटीतही त्यांना सांगणार आहे, की ती आशा आता सोडून द्या, असे अनंत गीते म्हणाले. जे बंडखोर गेलेत ते वैयक्तिक स्वार्थासाठी गेले आहेत. गेलेल्यांपैकी एकही परत येणार नाही. त्यांना पुन्हा घेऊ नका, जे गेलेत त्यांना मातीत गाडून टाका आणि नव्याने शिवसेना उभारा असे अनंत गीते यावेळी म्हणाले. गेलेल्या बंडखोरांच्या गळ्यात पट्टा आणि साखळी भाजपच्या हातात असल्याची टीकाही अनंत गीते यांनी यावेळी बंडखोर आमदारांवर केली.