रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी(दि.20सप्टेंबर)ला चिपळूणमध्ये आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. '23 जणांचे निष्पाप बळी गेल्यानंतर खेकड्यांनी धरण फोडल्याचं हे बेजबाबदार लोक सांगतात'; या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे म्हणून त्यांनी शासनाला धारेवर धरले.
शिवस्वराज्य यात्रेसाठी चिपळूणमध्ये आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली. 10 वर्ष त्यांच्या पक्षाचे या मतदारसंघात आमदार असताना जर अशी धरणं फुटायला लागली, तर असे खेकडे सर्वच ठेकेदारांना हवेहवेसे वाटतील, असे अमोल कोल्हे म्हणाले. अशा घटना टाळण्यासाठी तुम्हाला जागरूक व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.
सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात राजगड आहे. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात आहे. हा छत्रपतींच्या विचारांचा संकेत असून, त्यांच्या विचारांवर चालणारी सत्ता महाराष्ट्रात आणायची असल्यास राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन खासदार कोल्हे यांनी केले.
कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले; मग सेनेने कोकणला काय दिले, असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वच वक्त्यांनी शिवस्वराज्य यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कार्यकर्त्यांचे अभार व्यक्त करून परिवर्तन घडण्याचे आश्वासन दिले.