रत्नागिरी- नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी, मनसे या तीनही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तीनही पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
पोटनिवडणुकीसाठी २९ डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. शिवसेना, भाजप आमने सामने ठाकलेली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिवसेनेला आपली ताकत दाखवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, मनसे या तीनही पक्षांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा -यश अपयशातून उभे राहण्याची उर्जा आईकडून मिळाली - शरद पवार
भाजपचे उमेदवार अॅड.दीपक पटवर्धन यांनी मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठे शक्तीप्रदर्शन करत पटवर्धन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, राजेश सावंत, तालुकाध्यक्ष सुशांत चवंडे, शहर अध्यक्ष अण्णा करमरकर यांच्यासह नगरसेवक राजेश तोडणकर, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, प्रणाली रायकर आदींसह सर्व नगरसेवक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. अॅड. दीपक पटवर्धन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे हे व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.