रत्नागिरी - शहरात पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी अतिशय गंभीर झाला आहे. पाणी वितरण व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळेच परटवणे, राजीवडा, खालची आळी आदी भागात सध्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परटवणे भागात तर मागील तीन दिवस पाणीच आले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अखेर तीन दिवस पाणी न आल्याने नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. यावेळी महिला, जेष्ठ नागरिक आणि तरुणदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बुधवारी नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी यांची संतप्त नागरिकांनी भेट घेतली. यावेळी पाण्याविना सुरू असलेले हाल नागरिकांनी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासमोर मांडले. तीन तीन दिवस पाणी नाही. पाणी नसल्याने येथील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. दररोज विकत पाणी घ्यावे लागत आहे. काहीजणांची पाणी विकत घेण्याची परिस्थिती नसताना हा भुरदंड सहन करावा लागत आहे. नगरसेवक, अधिकारी यांची भेट घेऊनही पाणी मिळत नाही. मग आम्ही सामान्यांनी करायचे काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. यावर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
शहरात नव्या योजनेचे काम सुरू आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात पाण्याच्या टाक्यांची लेवल व्हावी यासाठी शहराच्या वरच्या आणि खालच्या भागात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यातून पाणी टंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी होतील. नादुरुस्त पाईपलाईनमुळे टंचाई सुरू असून ही दूर केली जाईल, असे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले.