रत्नागिरी- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी रात्रभर बरसल्यानंतर सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आल्याचे पाहायला मिळाले.
रात्रभर बरसल्यानंतर सकाळी पावसाचा जोर कमी;24 तासांत 59.14 मिमी पावसाची नोंद - ratnagiri rain update
गेले 2 दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी पुराचे पाणीही घुसले होते.रविवारी रात्रभर बरसल्यानंतर सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे..
गेले 2 दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी पुराचे पाणीही घुसले होते. चिपळूण शहराला तर शनिवारी रात्रीपासूनच वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढले होते. रविवारी दुपारनंतर पुराचे पाणी ओसरले. मात्र पावसाची संततधार कायम होती. रात्रभर पाऊस बरसल्यानंतरही सोमवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चिपळूण बाजारपेठेतील पाणी काही प्रमाणात ओसरले होते.
या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड तालुक्यातील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली या नद्यांनी आज इशारा पातळी ओलांडली होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 59.14 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस हा राजापूर तालुक्यात पडला असून, राजापूरमध्ये 94. 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वरमध्ये 87 मिमी, खेडमध्ये 65.10 मिमी, लांजामध्ये 60.20 मिमी, मंडणगडमध्ये 56.50 मिमी, चिपळूण 48.70 मिमी, गुहागर 46.30 मिमी, रत्नागिरी 43.40 मिमी, दापोली 30.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.