रत्नागिरी - कोरोनाविरोधाच्या लढाईत आता रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. जमावबंदी टाळण्यासाठी त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवाय, मुंबई, पुण्यातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही यावेळी मिश्रा यांनी सांगितले.
लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी - अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड
कोरोना व्हायरसचा संसर्ग देशभर पसरत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतल्या जात आहे. राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोरेनाला हरवण्यासाठी काही कठोर पावलं उचलली आहेत. दरम्यान, आता जिल्ह्यातील खासगी बससेवा पूर्णत: बंद ठेवली जाणार आहे. तसेच, केवळ महत्त्वाच्या कामासाठी कुटुंबातील एका व्यक्तिने घराबाहेर पडावे ते देखील योग्य कारणासाठी. अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी दिली. सध्या जिल्ह्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात 1 रुग्ण कोरोनाबाधित असून 230 जणांना होम क्वारंटाईन तर 11 जणांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर नसून केवळ खबरदारी म्हणून या सर्व उपाययोजना केल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.