रत्नागिरी : बारसू आणि सोलगावच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, चांगले प्रकल्प राज्याबाहेर गेले, वाईट प्रकल्प मात्र आणत आहेत. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या लोकांवर वरवंटा चालवणाऱ्याना लाज वाटत नाहीका असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. नारायण राणेंचा त्यांचे नाव न घेता सुक्ष्म असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, शिंदे-भाजप सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. त्यांचे सरकार पडणार हे जवळ-जवळ निश्चित आहे. शिंदेंची ओळख तीन जिल्ह्यातही नव्हती आता मात्र ते गद्दार म्हणून ३० देशात ओळखले जातात, असा घणाघातही ठाकरेंनी केला. प्रकल्पावरुन सत्ताधारी तो लोकांच्या हिताची गोष्ट आहे, असे सांगत आहेत. तर मग बळ का वापरत आहात, असा सवाल त्यांनी केला. आपण जर चुकलो असतो तर इथे आलोच नसतो असे सांगून ते इकडे यायला का घाबरत आहेत असाही मुद्दा ठाकरेंनी मांडला. प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तरी सरकार पडणार आहे, असे भाकितही ठाकरेंनी केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे कोकणात हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर ठाकरे यांनी सोलगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी गावकऱ्यांची बाजू समजून घेतली. भूमिपुत्रांच्या परवानगीशिवाय कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका आपली असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हुकुमशाहीने कोणताही प्रकल्प लोकांच्यावर लादू नका असे सांगून, ठाकरे यांनी राज्यसरकारला इशारा दिला. जर लोकांच्या विरोधात काही काम सुरू झाले तर महाराष्ट्र पेटवू असा सज्जड दमही ठाकरे यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे बारसूत आंदोनस्थळी ग्रामस्थांशीही चर्चा करणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या पुरातन कातळ शिल्पांची पाहणीही उद्धव ठाकरे करणार आहेत. लोकांचा विरोध डावलून या ठिकाणी काहीही करु देणार नाही अशी ठाम ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. रिफायनरीला विरोध असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण हा प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही अशी भूमिका असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी या परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून माती परिक्षणाचे काम सुरू आहे. त्याला प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी जोरदार विरोध करुन आंदोलन छेडले आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूत दाखल झाले आहेत. मात्र प्रशासनाने उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाडमध्ये सभा घेणार आहेत. दरम्यान राज ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा असल्याने दोन्ही ठाकरे बंधू आज कोकणात आमनेसामने उभे ठाकणार आहेत.
ठाकरे गटाकडून सभेची बारसूत तयारी :उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी भेटण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या बारसूतील सभेची जोरदार तयारी करण्यात येत होती. मात्र आता जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची सभा घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. पण याचवेळी बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या आंदोलकांच्या भेटीसाठी हेलिकॉप्टरने बारसूत दाखल झाले आहेत.