रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याची खंत राज्याच्या पर्यटन, क्रीडा व कल्याण राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
'निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान.. मात्र, केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नाही' - Aditi Tatkare in ratnagiri
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीनंतर केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. अशी खंत राज्याच्या पर्यटन, क्रीडा व कल्याण राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे शनिवारपासून दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. आज (शनिवार) त्यांनी चिपळूण, खेड, गुहागरचा दौरा केला. तसेच आढावा बैठकही घेतली. दरम्यान चिपळूण येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. मात्र, केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न झाले. विनंतीही करण्यात आली, की केंद्र सरकार जशी पश्चिम बंगालला किंवा भारताचा दक्षिण भाग इथे जशा पद्धतीने मदत करतात तशा पद्धतीची मदत करावी, अशी आम्ही वारंवार विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.