रत्नागिरी - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व पगारदार खातेदारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे पगारदार खातेदारांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पगार जमा होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट विमा पॉलिसी सुरू करण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून विचाराधीन होता. अखेर यावर संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी संबंधित माहिती दिली.
कर्मचाऱ्यांना कमाल 30 लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेंतर्गत विमाधारकाचे साप, श्वापद यांनी चावणे आणि बुडून मृत्यू होणे, यांसह अपघाती निधन झाल्यास 100 टक्के विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच दोन डोळे, दोन हात व दोन पाय कायमस्वरुपी निकामी झाल्यास 100 रक्कम अदा करण्यात येईल. एक हात, एक पाय, एक डोळा कायमस्वरुपी निकामी झाल्यास 50 टक्के विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा पॉलिसीचा संपूर्ण हप्ता बँकेमार्फत अदा केला जाणार आहे.