रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड तालुक्यात चार महिन्यांच्या कालावधीमध्ये लोटे एमआयडीमध्ये स्फोटाच्या सहा घटना घडल्या. यामध्ये अनेक कामगारांचा बळी जाऊन देखील ठाकरे सरकारची मदत पोहोचली नाही. फायर ऑडिट करणार असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला. कोरोनाच्या घटनांप्रमाणे राज्यात लागणाऱ्या आगींचे आरोप देखील केंद्रसरकारवर टाका, असा टोला निलेश राणे यांनी राज्य सरकारला लगावला. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे.
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सेटींग करण्यात व्यस्त -
रत्नागिरीमध्ये एवढे स्फोट होऊनसुद्धा शिवसेनेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे एमआयडीसीमध्ये होणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष केले आहे. लोटे एमआयडीसीमध्ये २५०हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्यांना क्लोजरच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. त्या कंपन्या बंद करण्याचा आदेश असतानाही तेथील स्थानिक शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सेटींग करण्यात व्यस्त आहेत. अशा सेटींगमुळे कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. काही कंपन्यांमध्ये जुनी साधनसाम्रुगी आहे. त्याच्याच आधारे नवीन उत्पन्न घेतले जाते. काही दिवसांपूर्वीच सेनेचे आमदार उदय सामंत यांनी कंपन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही ऑडिट झालेले नाही, असे निलेश राणे म्हणाले.
किती जणांचा बळी घेणार -
आग लागून देखील प्रशासन आणि सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या सेटींगमुळे लोटे एमआयडीसीत होणाऱ्या स्फोटाच्या घटना दडपल्या जात आहेत. अशी चर्चा लोटे परिसरातील नागरिक करत आहेत. कंपनी व्यवस्थापक, प्रशासन, सेनेचे लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळेच आगींमध्ये निष्पाप कामगारांचा बळी जातो. कामगारांचा बळी जाऊनदेखील ठाकरे सरकारने मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. अशा बेजबाबदारपणामुळेच कंपनी व्यवस्थापक अजून किती कामगारांचा बळी घेणार? आता लागणाऱ्या आगीचे आरोपदेखील केंद्रसरकारवर टाकणार का? असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.