रत्नागिरी - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय मानधनवाढीची पंतप्रधानांनी घोषणी केली. मात्र, राज्यात ही मानधनवाढ अद्यापही न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. त्यासाठी सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) यांच्यावतीने धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते.
सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्राने मानधनवाढीची घोषणा केली होती. बऱ्याच राज्यात हे वाढीव मानधन दिले गेले आहे. पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे मानधनवाढ तातडीने द्यावे. तसेच मानधनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जावी. या दोन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रभर अंगणवाडी कृती समितीच्यावतीने ३ ते ११ जून या कालावधीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ११ जून रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.