रत्नागिरी- आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी, लिपिक व इतर कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी फिरायला जात असताना आंबेनळी घाटात त्यांच्या बसला अपघात झाला आणि या भीषण दुर्घटनेत 30 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दापोलीकरांसाठी हा काळा दिवस ठरला होता. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक प्रश्न निरुत्तर आहेत.
या अपघाताच्या घटनेचा पोलीस तपास पूर्ण झाला आहे. मृत चालक प्रशांत भांबीड हाच गाडी चालवत होता आणि निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने गाडी चालवल्याने तोच इतर 29 जणांच्या मृत्यूला कारणीभूत आहे, असं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. तर प्रशांतवर दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून प्रशांत ऐवजी प्रकाश सावंत देसाई हाच गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशांतचे वडील प्रवीण भांबीड यांनी केली आहे.
घटना काय ?
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे 31 कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते. यामध्ये क्लार्क, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व इतर काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. मात्र सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेनळी दरीत ही बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला. तर प्रकाश सावंत देसाई हे एकमेव या दुर्घटनेतून बचावले होते. प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधिक्षक आहेत. देसाई यांनीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये फोन करून अपघाताचं वृत्त दिलं. त्यानंतर तब्बल 26 तास मदत आणि बचावकार्य चालले.
अपघातातील मृतांची नावं
संदीप भोसले, संजीव झगडे, पंकज कदम, नीलेश तांबे, प्रमोद जाधव, प्रमोद शिगवण, संतोष झगडे, हेमंत सुर्वे, राजेश सावंत, राजाराम गावडे, सचिन गुजर, संदीप सुवरे, सचिन गिम्हवणेकर, राजेश बंडबे, सुनील साटले, रत्नाकर पागडे, दत्तात्रय धायगुडे, सुनील कदम, जयंत चोगले, सुयश बाळ, सचिन झगडे, रोशन तबीब, संतोष जालगावकर, विक्रांत शिंदे, रितेश जाधव, राजू रिसबूड, किशोर चोगले, विनायक सावंत, प्रशांत भांबीड, संदीप झगडे.