रत्नागिरी- भारतात भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो. उकडीचे तांदूळ, गावठी तांदूळ, बासमती, सुवर्णा, कोलम असे अनेक प्रकारचे तांदूळ कोकणात उत्पादित केले जातात. पण आता काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाची शेती करायला सुरुवात केली आहे. हा प्रयोग यशस्वीही झाला आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सूर्वे या 26 वर्षांच्या युवकाने आपल्या शेतात या काळ्या तांदळाचे पीक घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे या तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन निर्माण केले आहे.
काळ्या तांदळाचा यशस्वी प्रयोग अभिषेक हा दापोली तालुक्यातील करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. मात्र कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे तो गावी आला. अभिषेकला सुरुवातीपासून शेतीची आवड. त्यामुळे यावर्षी शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचे त्याने ठरवलं. कंपनीच्या कामानिमित्त एकदा अभिषेक छत्तीसगडला गेला होता. त्यावेळी त्याला काळ्या भाताच्या शेतीविषयी समजले होते. याविषयी त्याने माहितीही घेतली होती. त्यामुळे अभिषेकने आपल्या घराजवळील शेतामध्ये काळ्या भाताची शेती करण्याचे ठरवले आणि गेली 4 महिने मेहनत घेऊन काळ्या भातशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळेच आज अभिषेकच्या दारात काळ्या भाताची शेती चांगली तरारलेली दिसून येत आहे. त्यामुळेच एक वेगळा आदर्श अभिषेकने शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
काळ्या तांदळाचे फायदे
काळ्या तांदळाचे अनेक फायदे आहेत. देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. 150 दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे. त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय आरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फारच फायदेशीर आहे. कार्बोहाइड्रेट युक्त असलेले हे काळे तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. काळे तांदूळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील नियंत्रणात येते. या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने हे पचण्यास उपयुक्त असतात. सोबतच ऑंटी ऑक्सीडेंट तत्व असल्याने हे डोळ्यासाठी देखील उपयुक्त ठरतात.
काळा तांदूळ हा स्वास्थासाठी अधिक लाभदायक आहे. त्यामुळेच या काळ्या तांदळाला मोठ्या शहरांत बरोबर परदेशात देखील मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ किमान चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकला जातो.
शेतकऱ्यांना फायदेशीर
काळ्या तांदळाला मोठी मागणी आहे, त्यात किंमतही चांगली मिळते. त्यामुळेच काहीतरी वेगळं करायचं असेल तर कोकणातील शेतकऱ्यांनी या काळ्या भात शेतीच्या प्रयोगाकडे वळायला हरकत नसल्याचे मत कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.