रत्नागिरी : कोकणात हाहाकार माजविणाऱ्या महापुराच्या तडाख्याने रत्नागिरीतही प्रचंड नुकसान केले आहे. जिल्ह्यातील लाखो लोकांना पुराचा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरे, दुकाने, व्यवसाय, शेतीचं पुरात प्रचंड नुकसान झालं आहे. पुरात अक्षरशः बुडालेल्या चिपळूण शहरातील अनेक व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शहरातील प्रिटिंगचा व्यवसाय उभा करणारा एक तरूण तर या पुराने अक्षरशः उध्वस्त झाला आहे.
एका दिवसात होत्याचे नव्हते
चिपळूण शहरात प्रिटिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाचे दुकान पुरात पूर्णपणे बुडाल्याने दुकानातील प्रिंटिंग मशीनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. सहा वर्षांपासून पै पै जमवून या तरुणाने हा व्यवसाय सुरू केला होता. मात्र महापुराच्या तडाख्यात सर्व वस्तू निकामी झाल्याने हा तरूण जवळपास उध्वस्तच झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे आता पुरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होताना दिसत आहे.