रत्नागिरी -कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद आहे. मात्र, या परिस्थितीतही चिपळूणमध्ये वाळू माफियांनी आपलं डोकं वर काढलं असून नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे वाळू उत्खनन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची कुणकुण लागताच प्रशासनाने धडक कारवाई केली असून बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या तब्बल ९ बोटी गुरुवारी मध्यरात्री खाडीतच बुडवण्यात आल्या. महसूल विभागाच्या पथकाकडून तब्बल ६ तास ही कारवाई सुरू होती.
संचारबंदीत वाळू उत्खनन करणाऱ्या 9 बोटी नदीत बुडवल्या, चिपळूणमध्ये प्रशासनाची मोठी कारवाई - Revenue Department ratnagiri news
गोवळकोटसह काही भागात खाडीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. हा प्रकार निदर्शनास येताच महसूल विभागाच्या पथकाने दुसऱ्या बोटीने वाळू उपसा होत असल्याच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली. दरम्यान, वाळू माफियांनी पळ काढला. अधिकाऱ्यांनी या बोटींची पाहणी केली असता ९ बोटींमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रास वाळू आढळून आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी करण्यात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या कामात गुंतले आहे. याच गोष्टींचा फायदा चिपळुणातील काही वाळू माफियांनी उचलला आहे. गोवळकोटसह काही भागात खाडीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. याची दखल घेऊन प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, चिपळूण मंडल अधिकारी युआर गिज्जेवार, आरपी मोहिते, जेपी क्षीरसागर यांचे पथक गुरुवारी संध्याकाळी गोवळकोट, कालुस्ते आदी ठिकाणी खाडीकिनारी गस्त घालत होते. यावेळी गोवळकोट खाडीत बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे महसूल विभागाच्या पथकाने दुसऱ्या बोटीने वाळू उपसा होत असल्याच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली.
अधिकाऱ्यांची बोट आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच बोटींवरील कामगारांनी बोटींसह किनाऱ्याच्या दिशेने पलायन केले आणि त्या बोटी तेथेच सोडून पोबारा केला. महसूल विभागाचे अधिकारीदेखील या बोटींच्या ठिकाणी तत्काळ पोहोचले. यानंतर या बोटींची पाहणी केली असता ९ बोटींमध्ये प्रत्येकी सुमारे २ ब्रास वाळू आढळून आली. त्यांनी ती माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना दिली. याबाबत माहिती मिळताच या दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नंतर अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत कार्यवाही करण्यास सांगितले. मात्र, बोटींची मालकी सांगण्यास कोणीही पुढे न आल्याने अखेर या ९ बोटी अखेर खाडीतच बुडविण्यात आल्या.