रत्नागिरी -दापोली विधानसभा मतदारसंघ यावेळी चर्चेत आहे तो एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे. संजय कदम नावाचे चार उमेदवार तर योगेश कदम नावाचे दोन उमेदवार यावेळी दापोली विधानसभा निवडणुकीत उभे आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात असल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.
दापोलीत एकाच नावाचे अनेक उमेदवार, कोणाला बसणार फटका?
दापोली विधानसभा मतदार संघात एकाच नावाचे अनेक उमेदवार आहेत. या मतदार संघात संजय कदम नावाचे चार तर योगेश कदम नावाचे दोन उमेदवार आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघात खरी लढत आहे ती शिवसेनेचे योगेश रामदास कदम व राष्ट्रवादीचे संजय वसंत कदम यांच्यात आहे. मात्र, त्यांच्या नावात साधर्म्य असलेले आणखीन तीन अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून अपक्ष उभे आहेत. विधानसभा निवडणुकीत खरी लढत तुल्यबळ उमेदवारांच्यात असते. मात्र, जर नावात साम्य असेल तर अनेकदा मतदार गोंधळून नावात साम्य असलेल्या उमेदवाराला मतदान करतात. त्यामुळे काही मते त्यांच्या पारड्यात पडतात. यांचा काहीसा परिणाम तुल्यबळ उमेदवारांवरही होत असतो. चिन्हांकडे न पाहता नावाप्रमाणे मतदान केले तर हा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे अशा युक्त्या निवडणुकीत वापरल्या जातात.
दापोली मतदारसंघात यावेळी विद्यमान आमदार संजय वसंत कदम हे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या नावात साधर्म्य असलेले आणखीन तीन अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून अपक्ष उभे आहेत. संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम ,संजय संभाजी कदम असे हे उमेदवार आहेत. यामुळे या मतदारसंघात संजय कदम नावाचे चार उमेदवार झाले आहेत. शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांच्या व्यतिरिक्त योगेश दीपक कदम या नावाचा अपक्ष उमेदवार उभा आहे. नावातील साधर्म्यामुळे अनेक वेळा मते चुकीच्या उमेदवाराला जाऊ शकतात. त्यामुळे नावात साधर्म्य असलेले उमेदवार नेमकी किती मतं घेतात आणि ती कोणासाठी फायदेशीर ठरतात हे निकालानंतर स्पष्ट होईल.