रत्नागिरी- खेड तालुक्यातील फुरुस-फळसोंडे येथील जंगलात ७ अजगर मारून एकाच ठिकाणी पुरल्याचे समोर आले होते. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी वनविभागाने ४ जणांना अटक केली आहे. जितेंद्र मिसाळ (फुरूस, फलसोडा), तज्जमुल परकार (फुरूस गावठान), सलीम महाडिक (फूरूस, फळसोडा), सुनील पाटील (फुरुस) अशी या आरोपींची नावे आहेत.
शनिवारी २ फेब्रुवारीला सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये फुरुस-फळसोंडे-पोयनार या मार्गावरील जंगलमय भागात ७ अजगर मारल्याचे दिसत होते. ही घटना गंभीर असल्याने, वनपाल अनिल दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जंगलात शोध सुरु केला असता, त्यांना जंगलात एका ठिकाणी ७ अजगर पुरल्याचे आढळून आले. यामध्ये २ मादी आणि ५ नरांचा समावेश होता. हा प्रकार गंभीर असल्याने दळवी यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.