रत्नागिरी -जिल्ह्यात बुधवारी रात्री एकाच वेळी 22 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 74 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 1 मेपर्यंत जिल्ह्यात एकूण 6 रुग्ण होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मे रोजी पुन्हा दोन कोरोना रुग्ण सापडले. त्या दिवसापासून ही संख्या वाढतच गेली. कधी 4, तर कधी 5, एके दिवशी 13 रुग्ण सापडले होते. यामध्ये आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. दरम्यान, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली होती, तर बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये मंडणगडमधील 11, रत्नागिरीतील 7 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.