गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 20 नव्या गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेच्या सहकार्यातून गणपती स्पेशलच्या आणखी वीस नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेच्या सहकार्यातून गणपती स्पेशलच्या आणखी वीस नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या गाड्या 17 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट या कालावधीत कोकण रेल्वेच्या मार्गावर धावतील. याआधी घोषणा झालेल्या 162 गाड्यांच्या व्यतिरिक्त या 20 गाड्या असतील. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर आता गणेशोत्सव स्पेशलच्या 182 गाड्या धावणार आहेत. शुक्रवारी उशिरा या नव्या 20 गाड्यांची घोषणा झाली आहे.
कशा असणार 20 गाड्या -
1) मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल या गाडीच्या एकूण 4 फेऱ्या होतील. ही गाडी 17 आणि 24 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी मुंबई सेंट्रल वरून सुटेल, त्यानंतर 18 आणि 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सावंतवाडीहून मुंबई सेंट्रलसाठी सुटेल.
2) बांद्रा ते सावंतवाडी रोड- बांद्रा या गाडीच्याही 4 फेऱ्या असणार आहेत. ही गाडी 18 आणि 25 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी बांद्रा वरून सुटेल, त्यानंतर 19 आणि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सावंतवाडीहून सुटेल.
3) बांद्रा ते कुडाळ - बांद्रा या गाडीच्याही चार फेऱ्या असणार आहेत. 20 आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता ही गाडी बांद्रावरून सुटेल, त्यानंतर परतीच्या वेळी ही गाडी कुडाळवरून 21 आणि 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.
4) मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड - मुंबई सेंट्रल या गाडीच्या एकूण 4 फेऱ्या होतील. ही गाडी 19 आणि 26 ऑगस्ट रोजी रोजी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी मुंबई सेंट्रल वरून सुटेल, त्यानंतर 20 आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सावंतवाडीहून मुंबई सेंट्रलसाठी सुटेल.
5) बांद्रा ते सावंतवाडी रोड- बांद्रा या एसी स्पेशल गाडीच्याही 4 फेऱ्या असणार आहेत. ही गाडी 23 आणि 30 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी बांद्रा वरून सुटेल, त्यानंतर 24 आणि 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सावंतवाडीहून सुटेल.