रत्नागिरी -खाडीत फेरफटका मारण्यासाठी बारा जणांना घेऊन गेलेली छोटी नौका बुडाल्याची घटना सोमवारी रत्नागिरी तालुक्यात घडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली नजीकच्या म्हामूरवाडी किनारी साखरतर खाडीत ही दुर्घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये आठ वर्षाच्या बालकासह दोन महिला असा तिघांचा मृत्यू झाला. यावेळी तीन स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नऊ जणांना वाचवण्यात यश आले.
तिघांचा मृत्यू
या घटनेमध्ये राहिला नदीम बारगीर (35), जबीना मोहम्मद हनिफ जामखंडीकर (50) व शायान यासीन शेख (8) या तिघांचा मृत्यू झाला आहे. आहील मिराज बारगीर (2), शमशाद दिलावर गोलंदाज (45) यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेतील मुबारक दिलावर गोलंदाज (24), नदीम अहमद बारगीर (40), यास्मीन दिलावर गोलंदाज (25), सुलताना यासीन शेख (28), रेहान यासीन शेख (10), जियान नदीम बारगीर (9), अफसरा बारगीर (11) यांची प्रकृती स्थीर आहे. हे सर्व राहणार मिरज किल्ला या भागातील आहेत.
नौका बुडून ८ वर्षाच्या बालकासह २ महिलांचा मृत्यू लग्न समारंभासाठी मिरज येथून आले होते गावी कासारवेली म्हामूरवाडी येथे एका लग्न समारंभासाठी मिरज येथून बारगीर कुटुंब गावी आले होते. रविवारी लग्नसमारंभ झाले. सोमवारी लग्न घरामध्ये जेवणावळीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी मूळ म्हामुरवाडी येथील व सध्या मिरज येथे राहणारा नदीम आपल्यासोबत आलेल्या पाहुण्यांना छोट्या नौकेतून खाडीत फिरण्यासाठी घेऊन गेला होता.
पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे नौका उलटली
होडीत चार छोट्या मुलांसह बारा व्यक्ती बसल्या होत्या. क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती झाल्यामुळे होडी आधीच खाली बसली होती. पाण्याच्या पातळीला होडी आली होती. खाडीच्या मध्यभागी होडी गेली असतानाच भरती सुरु झाली. त्यामुळे खाडीत पाण्याला करंट आला होता. पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे नौका उलटली व सर्वजण पाण्यात पडले. यातील राहिला बारगीर, जबीना जामखंडीकर व शायान शेख हे तिघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तर बाकीच्यांनी थर्माकॉलचे सेफ्टीगार्ड धरुन तरंगण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदीम व अन्य व्यक्तींनी मदतीसाठी आरडाओरड केली.
तीन तरुणांनी घेतली मदतीसाठी धाव
हा प्रकार सुरु असताना शफीर बोरकर, अझर मिरकर व उमेर पटेल या तिघांनी आरडाओरड ऐकून मदतीसाठी धाव घेतली. होडीच्या सहाय्याने घटनास्थळी जावून नऊ जणांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने वाहून गेलेल्या तिघांनाही बाहेर काढले. दरम्यान, तिघांचा पाण्यात घुसमटल्याने मृत्यू झाला होता. या सर्वांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेनंतर बुडालेली नौका भरतीच्या प्रवाहात वाहून गेली होती. मात्र ही होडीही ग्रामस्थांनी शोधून किनार्यावर आणून बांधून ठेवली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीणचे निरीक्षक विनित चौधरी हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे हेही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन ग्रामस्थांकडून माहिती घेतली.