रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले आहेत. चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये हे दोन्ही रुग्ण सापडले असून हे दोन्ही रुग्ण मुंबई तसेच ठाण्यातून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा दोन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक
ऑरेंज झोनमध्ये असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी आणखी दोन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये मुंबई आणि ठाण्याहून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चिपळूण येथील कोरोनाबाधित व्यक्ती ही मुंबईतील काळाचौकी येथील रहिवासी असून तिच्यावर जेजे रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचार सुरू होते. यापूर्वी या व्यक्तीचे मुंबईत घेतलेले स्वॅब निगेटिव्ह आले होते. त्यानंतर ही व्यक्ती चिपळूणमधल्या गावी आली होती. तर संगमेश्वर येथील व्यक्ती ही ठाणे येथून आली आहे. हे दोघेही संस्थात्मक क्वारंटाईन होते.
दरम्यान, मुंबई पुण्यातल्या हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करुन स्वॅब घेण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाचे 6 रुग्ण सापडले होते. त्यामध्ये एका 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. दरम्यान 6 पैकी खेड मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. या पाचही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. पण, आता पुन्हा एकदा कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 8 झाला आहे.