रत्नागिरी -अद्यापही दुबईत अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरुप परत पाठवण्यासाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी १८६ रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्वखर्चाने चार्टर्ड फ्लाईटने भारतात पाठवले होते. याच मोहिमेअंतर्गत आता दुसऱ्या फेरीत महिला व लहान मुलांचा समावेश असलेल्या अनेक मराठी कुटूंबांना संधी मिळाली आहे. एकूण १३६ महाराष्ट्रीयांची दुसरी तुकडी बुुधवारी विमानाने परतली आहे. या कुटुंबामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुटुबांचा समावेश आहे.
कोरोनाची साथ व लॉकडाऊन काळात हजारो भारतीय संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) अडकून पडले होते. दुबईहून भारतातील विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते. त्यात रोजगारवंचित कामगार, विद्यार्थी, गरोदर महिला व लहान मुले यांचाही समावेश होता. रोजगार गमावल्याने व राहत्या जागेचे भाडे भरण्यासाठीही खिशात पैसे नसल्याने बऱ्याच लोकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता. त्यांच्यापुढे रोजच्या भोजनाचा प्रबंध कसा करायचा याबाबतच्याही अडचणी होत्या. एकट्या महाराष्ट्रातील ६५ हजारहून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे अशा कठीण परिस्थितीत आपल्या निर्धन देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवले होते. युएई आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी कंपनी सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत जवळपास ३ हजार ५०० गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकीटाचा खर्च उचलून त्यांना सुखरुप भारतात रवाना केले. त्यामध्ये केरळ, तमीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी डॉ. दातार यांनी आतापर्य़ंत ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.