रत्नागिरी - मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर आणि मालगुंड चार ग्रामपंचायतींमधील कोरोना बाधितांसाठी गणपतीपुळे देवस्थानच्या भक्त निवासात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
गणपतीपुळे देवस्थानची सामाजिक बांधिलकी
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील अनेक बाधितांना कोविड कक्षात बेडस् मिळत नाही. यामध्ये बहुतांश हे लक्षणे नसलेले आहेत. त्यांची व्यवस्था करण्यासाठी गावस्तरावर रिकाम्या खोल्यांचा विलगीकीकरणासाठी वापर करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. गणपतीपुळे, मालगुंडसह आजुबाजूच्या परिसरात कोरोना बाधित सापडत आहेत. त्यांच्यासाठी गणपतीपुळे देवस्थानकडून विलगीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. गणपतीपुळे देवस्थानने आतापर्यंत अनेक आपत्कालीन स्थितीमध्ये सामाजिक भान ठेवून काम केले आहे.
गणपतीपुळे देवस्थानच्या भक्त निवासात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू - ganpatipule bhakt niwas covid center
गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर आणि मालगुंड चार ग्रामपंचायतींमधील कोरोना बाधितांसाठी गणपतीपुळे देवस्थानच्या भक्त निवासात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
देवस्थानकडून मोफत बेड, गाद्या आणि पाण्याची व्यवस्था
कोरोनासारख्या महामारीमध्येही देवस्थान मागे नाही. याबाबत माहिती देताना देवस्थानचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विवेक भिडे म्हणाले की, गावातील कोरोना बाधितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू केला जात आहे. या कक्षात स्त्रियांना ४० बेड, पुरुष ४० बेड व २० बेड राखीव असे १०० बेडचे सेंटर आहे. या ठिकाणी लक्षणे नसलेली, पण कोविड बाधित असणारे रुग्ण ठेवले जाणार आहेत. तसेच देवस्थानकडून मोफत बेड, गाद्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली हे केंद्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भिडे यांनी दिली आहे.