रायगड - बदलापूर येथील राहणाऱ्या तरुणाचा नेरळ येथील उल्हासनदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव सुधीर अडागळे आहे. सुधीर हा बदलापूर - खरवाई येथील रहीवासी असल्याचे समजते आहे. नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उल्हासनदी पात्रात शोध घेऊन मृत सुधीरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार 8 एप्रिलला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सुधीर व त्याचे अन्य तीन साथीदार असे चार जण कर्जत तालुक्यातील नेरळ बोपेले येथील उल्हास नदीतीरी फिरण्यासाठी रिक्षाने आले होते. आपण आणलेले वाहन पार्क करून नदीच्या पात्राजवळ पार्टी करत असताना पोहण्यासाठी म्हणून सुधीर बरोबर अन्य साथीदार देखील पाण्यात उतरले होते. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने आपला साथीदार बुडत असल्याचे पाहून सुधीरने त्या साथीदाराला वाचवले. परंतु साथीदार बाहेर आल्यावर सुधीर कुठे दिसून येत नसल्याने मित्रांनी याबाबत स्थानिक गावकरी व पोलिसांना या बाबत माहिती दिली.