खालापूर (रायगड) - खोपोली वासरंग परिसरात पोलाद उत्पादन करत असणाऱ्या महिंद्रा सनियो कारखान्यातील संतोष तोंडे कामगाराचा शुक्रवारी (दि. 6 ऑगस्ट) कारखान्यात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रुग्णवाहीका उपलब्ध झाली नसल्याने कामगारला दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यात आले. वेळीच रुग्णवाहिका मिळाली नसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कंपनी व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिले आहे. तर कामगाराला दुचाकीवरून नेणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
संतोष तोंडे हा कामगार कारखान्यात काम करत असताना चक्कर येऊन पडला. कंपनी प्रशासनाने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने अन्य कामगारांनी बेशुध्दावस्थेत दूचाकीवरून त्याला रुग्णालयात नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.