रायगड- आज जागतिक महिला दिवस जगभरात साजरा केला जात आहे. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. महिलांही आता सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत. नोकरी, व्यवसायामध्ये महिला पुरुषाबरोबर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या मुख्य शासकीय कार्यालयातही सध्या महिलाराज आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आणि रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ही जिल्ह्याची पदे सोडल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, जिल्हा वाहतूक नियंत्रक, उत्पादन शुल्क, आरटीओ, निवडणूक अधिकारी, जिल्हा भूमी अभिलेख, उपजिल्हाधिकारी तसेच 4 प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर महिला कार्यरत आहेत. तर राजकीय क्षेत्रात पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष यासुद्धा महिलाच आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कारभार हा खऱ्या अर्थाने महिलांच्याच हातात आहे.
हेही वाचा -"पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चार कोरोना रुग्ण आढळल्याची अफवा"
चूल आणि मूल ही संकल्पना आता मागे पडली आहे. महिलाही आता आपल्या पायावर उभ्या राहण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक क्षेत्र हे आता महिलांनी व्यापलेले आहेत. महिलेच्या हातात घराच्या चाव्या असल्या की, घराला घरपण प्राप्त होत असते. कामात असलेली एकनिष्ठा त्यामुळे महिला या उच्चपदावर आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. दिलेली जबाबदारी पूर्ण करतात. त्यामुळे हल्ली पुरुषांपेक्षा महिलांचा नोकरी, व्यवसायमध्ये दबदबा वाढू लागला आहे.