पनवेल- लग्नाआधी ज्याप्रमाणे पत्रिका तपासली जाते त्याचप्रमाणे आरोग्य पत्रिका तपासून घेणे आजच्या काळाची गरज बनली आहे. परंतु, लग्नाआधी आरोग्य चाचणी करण्याची गरज नाही, असा पवित्रा आजही अनेकांचा असतो. आरोग्य चाचणी गांभीर्याने न घेता लग्न केल्याने पनवेलच्या कामोठेतल्या एका मुलीला लग्नानंतर एचआयव्हीची लागण झाली आहे. त्यामुळे लग्नाआधीपासूनच एचआयव्ही असल्याची बाब लपवून या मुलीशी लग्न करणाऱ्या पतीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -पेणमधील मुलांनी २३३ किलोमीटरचे अंतर पोहून नोंदवला विक्रम
पनवेल परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह कल्याण येथील तरुणाशी 2016 मध्ये झाला. विवाहानंतर पतीच्या प्रकृतीविषयी काही नातेवाईकांनी चौकशी सुरू केली होती. त्यात त्याला काही नातेवाईक आणि कुटुंबीय औषध घेण्याची आठवण करून देत होते. त्याच्या जेवणाविषयीही कुटुंबातील काही लोक अधिक काळजी घेत होते. याबद्दल तक्रारदार तरुणीने चौकशी सुरू केली. तिचा पती नेमकी कोणत्या प्रकारची औषधे घेतो, वा त्यांच्या जेवणाविषयी अधिक खबरदारी का घेतली जात आहे? याबद्दल तरुणीने विचारणा केली. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही.