रायगड- सुकापूर येथे असलेल्या 'वीर पार्क' हॅाटेलमध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. पत्नीसोबतच्या भांडणाचे पर्यवसन या अघोरी प्रकारात झाले असून आधी पत्नीचा खून करून नंतर पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही हत्या आहे, की आत्महत्या याचा उलगडा अजून झालेला नाही.
सुकापूर भागतवाडी जवळच्या हॉटेल वीर पार्कमध्ये या दोघांनी राहण्यासाठी रूम घेतली होती. रात्री जेवण करून दोघे जण रूमवर आले. बुधवारी ते रूम सोडणार होते. हे दोघेही सकाळपासून रूममध्येच होते. मात्र, रूममध्ये गेल्यापासून दोघांचा हॉटेलमधील कर्मचार्यांशी कोणताही संपर्क नव्हता आणि ते बाहेरसुद्धा आले नाहीत. रात्री 8 च्या सुमारास हॉटेलमधील कर्मचार्यांना या दोघांच्या बाबतीत संशय आला.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजाची बेल वाजवली आणि जोरजोरात दार वाजवले, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहून कर्मचाऱ्यांनी खिडकीतून रूममध्ये प्रवेश करून पाहिले असता रूममध्ये दोघांचा मृतदेह आढळून आले. त्यानंतर लगेच हॉटेल मालकाने खान्देश्वर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दोघांनी ही रूम घेताना जे ओळखपत्र आणि पत्ता दिला होता, त्यानुसार पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे. लवकरच या घटनेचे गूढ उकलेल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केली असावी, मात्र या पाठीमागचे नेमके कारण काय असावे, हे समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता. त्यातूनच हे प्रकरण घडले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरू केले होते.