रायगड : एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर टांगती तलवार घेऊन उभे ठाकले असताना जिल्ह्यात आता दरवर्षी प्रमाणे पाणीटंचाई समस्येने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यातील 119 गाववाड्यामध्ये पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे पाणी टंचाई सुरू झालेल्या गाव वाड्यावर आता 12 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. मात्र असे असतानाही जिल्हा प्रशासन रायगड जिल्हा हा टँकरमुक्त कधी करणार हा प्रश्न दरवर्षीप्रमाणे अनुत्तरीतच राहिला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस दरवर्षी पडत असून सरासरी तीन हजार मी. मी. पाऊस पडत असतो. 2019साली तर हा रेकॉर्ड तोडून साडेचार हजार मी. मी. पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असे चित्र तयार झाले होते. मात्र योग्य नियोजन अभावामुळे यावर्षीही पाणीटंचाई समस्येने डोके वर काढले आहे. दरवर्षी जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जातो. यावर्षी हा आराखडा नऊ कोटीच्या घरात गेला आहे. दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखड्यात वाढ होत चालली आहे. मात्र पाणी टंचाई समस्या जैसे थी राहिली आहे.