रायगड - डिसेंबर महिन्यातच पनवेलमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. पनवेलमध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली, तरीही आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पनवेलकरांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
पनवेलकरांवर पाणीटंचाईचे सावट
पनवेल शहराला दररोज सुमारे तीस दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. त्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चार ते पाच एमएलडी आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून सहा एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. सध्या देहरंग धरणात दीड हजार दशलक्ष लिटर पाणी आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. या वर्षीही तशी परिस्थिती येऊ नये म्हणून पालिकाप्रशासनाने आत्तापासूनच पाणी एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - मुंबई महानगरपालिका मुख्यालयात काचा फुटून झालेल्या अपघातानंतर आता अॅक्रॅलिकचा वापर
वेगवेगळ्या विभागात चार वेगवेगळ्या दिवशी पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे एकत्रितपणे पनवेलकरांवर याचा ताण पडणार नाही. उन्हाळ्यात निर्माण होणार्या पाण्याच्या तुटवड्यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिन्याला सुमारे 120 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांनी दिली.
महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहराची पाणी समस्या नष्ट होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, मागील तीन वर्षांत याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. पाणीकपातीच्या या निर्णयाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सतीश पाटील यांनी विरोध करून निषेध व्यक्त केला आहे. येत्या महासभेत हा प्रश्न लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाणी कपातीमुळे विशेष करून महिलांना खूप त्रास होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक असताना पाणीकपात कशाला? असा प्रश्न महिला रहिवाशांनी केला आहे.