रायगड - उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (३ ऑक्टोबर) आणि (४ ऑक्टोबर) हे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांनी आजचा मुहुर्त गाठत अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांनी चक्क बैलगाडीतून जात उमेदवारी अर्ज दाखल केला.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अर्ज भरण्यास देखील सुरूवात झाली आहे. कुणी अर्ज भरण्यासाठी हजारोंची गर्दी घेऊन जात आहेत. तर कोणी हटके स्टाईल अवलंबताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि बहुजनांचे राज्य आणण्याच्या स्वप्नातून शेकापची सुरुवात झाली. शेतकरी चळवळ पहिल्यासारखी आणखी मजबूत करण्यासाठी विवेक पाटील हे उरण मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.