पनवेल : शेकापच्या बालेकिल्ल्यात मनसेची जोरदार मुसंडी! - Peasants and Workers Party of India
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरातील वहाळ व मोरावे गावाच्या हद्दीत मनसेने आपला झेंडा रोवला आहे. या दोन्ही गावाच्या शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.
पनवेल - शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरातील वहाळ व मोरावे गावाच्या हद्दीत मनसेने आपला झेंडा रोवला आहे. या दोन्ही गावांच्या शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पनवेल उरण परिसरात मनसेत जोरदारपणे इनकमिंग सुरू झाली आहे. वहाळ आणि मोरावे याठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनसेच्या शाखेचे उद्घाटनही करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 7-8 महिन्यांपासून राजकीय हालचाली मंदावल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठिकठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः, शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असलेल्या गावात राज ठाकरेंवर विश्वास ठेवून तुम्ही मनसेमध्ये आला आहात. त्यामुळे तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी पक्षप्रवेश केलेल्या व्यक्तींना केले. तसेच कोणत्याही मनसैनिकाला अर्ध्या रात्रीही समस्या असल्यास त्याठिकाणी मनसे मदतीला धावून येणार, असेही ते म्हणाले. कोरोना काळात मनसेने सर्वाधिक लोकांची मदत केली व अजूनही मनसेने घेतलेले लोकसेवेचे व्रत अविरतपणे सुरूच असल्याची प्रतिक्रिया मनसैनिकांकडून व्यक्त करण्यात आली.