रायगड - एक एक पैसा जमवून हक्काचे घर घेतले, मात्र बिल्डरच्या निकृष्ट कामामुळे उभारलेला संसार डोळ्यादेखत गाडला गेला. ही करूण कहाणी आहे, तारिक गार्डन इमारतीतील वाचलेल्या कुटूंबाची. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलेला आपला विस्कटलेला संसार शोधण्यात आता येथील रहिवाशांनी सुरुवात केली आहे. ढिगाऱ्यात आपल्या हरवलेल्या वस्तू मिळतात का? या आशेने या नागरिकांच्या नजरा सैरावैरा फिरत आहेत.
पीडितांचा संसार शोधण्याचा प्रयत्न २४ ऑगस्टला सायंकाळी काळजपुरा परिसरातील तारिक गार्डन इमारत कोसळली. 75 रहिवासी हे आपला जीव वाचवून कसेबसे बाहेर पडले. तर 17 रहिवासी हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. प्रशासनाने त्वरित बचावकार्य सुरू केले. 40 तासानंतर प्रशासनाला 16 मृतदेह आणि 2 जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले. हेही वाचा -'महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; आरोपींची गय केली जाणार नाही'
बचावकार्य संपल्यानंतर येथील रहिवाश्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आपला बेघर झालेला संसार मातीच्या ढिगाऱ्यात शोधण्यास सुरुवात केली. अद्याप या नागरिकांचा आपल्या फ्लॅटच्या जागेवर घरातील महत्वाच्या वस्तू, कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे बेघर झाल्याचे दुःख तर दुसरीकडे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना गमावल्याचे. पण अशातही आपला विस्कटलेला संसार शोधण्यासाठी या रहिवाशांची धडपड सुरू आहे. निदान आता तरी या नागरिकांना न्याय मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा -महाड इमारत दुर्घटना : न थकता 'तो' पोकलन चालवत करतोय बचावकार्य, चार वर्षाच्या मुलाला वाचवण्यात मोठा वाटा